Sunday, October 2, 2016

मऊ ढगांचा कापूस !!

पाऊस आणि कवितेचं एक अनोखं नातं आहे. धुंद वातावरण, भरलेलं आभाळ, रिमझिमणारा पाऊस.. कधी साधा सरळ तर कधी रौद्र रूप धारण करणारा... असा हा पाऊस प्रत्येक मनाला काही तरी सुचवून जातोच.. अलगद शब्द मनातून कागदावर उतरतात.. आणि साकारतं एक सुंदर पाऊस गाणं... कवी सौमित्र यांचे तरल शब्द आणि गायक मिलिंद इंगळे यांचा सुमधूर स्वर आणि संगीत लाभलेला ‘मऊ ढगांचा कापूस’ हा नवाकोरा म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘इनरव्हॉइस प्रॉडक्शन’ कंपनीने याची निर्मिती केली असून दिग्दर्शन निलेश अरुण कुंजीर यांनी केलंय.

एरव्ही पाऊस गीतांचा विषय निघाला की अनेक पाऊस गाणी आपल्या मनात फेर धरतात. त्यात हमखास ओठांवर येणारं एव्हरग्रीन गाणं म्हणजे मिलिंद इंगळे यांचं ‘गारवा..’ हे गीत. मन प्रसन्न करणाऱ्या  या गीताची जादू आजही कायम असून आपल्या चाहत्यांसाठी मिलिंद यांनी ‘मऊ ढगांचा कापूस’ हा नवा म्युझिकल व्हिडिओ आणला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला मिलिंद त्यांच्यासोबत हेमल इंगळे ही अभिनेत्री दिसणार आहे. सिनेमॅटोग्राफी धनराज वाघ यांनी केली असून संकलन जागेश्वर ढोबळे यांचे आहे. या गीताचे नृत्यदिग्दर्शन संकेत आणि रसिका आजरेकर यांनी केलं आहे. मिलिंद इंगळे यांच्या ‘इनरव्हॉइस प्रॉडक्शन’ कंपनीच्या बिझनेस पार्टनर वृंदा आडिवरेकर यांचा देखील या निर्मितीत सहभाग आहे.

मिलिंद इंगळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘गारवा’ नंतर नवीन पाऊस गाणे कधी येतंय अशी प्रेक्षकांकडून नेहमीच मला आणि सौमित्रला विचारणा व्हायची. नवीन काहीतरी सुचेल तेव्हा नक्की अशा गाण्याची मेजवानी तुमच्यासाठी आणेन, असे मी प्रत्येकवेळी म्हणायचो आणि तो योग ‘मऊ ढगांचा कापूस’च्या निमित्ताने जुळून आला आहे.

हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात चित्रीत झालेला ‘मऊ ढगांचा कापूस’ श्रवणीय सोबत प्रेक्षणीय देखील झाला आहे.