"ढाई अक्षर प्रेम के" सिनोप्सिस
आजकालच्या धावपळीच्या युगात माणसांवरचा तणाव वाढतो आहे. तणावांचा परिणाम वैयक्तिक नातेसंबंधांवर होताना दिसत आहे. वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना एकटेपणा पसंत करणारा माणूस हा स्वतंत्र होतो आहे का एकटा पडतो आहे हा मानसशास्त्रीय प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर येत आहे.ज्येष्ठ साहित्यिक व.पु.काळे यांनी त्यांच्या "तू भ्रमत आहासी वाया' या कादंबरीत या प्रश्नांचा काळाच्या पुढे जाऊन विचार केला आहे. या प्रश्नांचं चिंतन करताना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माणसाने स्वतःच्या गरजा नेमक्या किती आणि कोणत्या आहेत त्या ओळखणं आणि स्वतःला आणि नातेसंबंधांना जास्तीतजास्त "डोळस" वेळ देणं ही माणसाच्या सुखी आणि आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली ठरू शकते असा विचार व.पु.काळे मांडतात. आपल्या कडे नसलेल्या गोष्टींच्या मागे धावण्या पेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घेणे यातूनच सुख सापडू शकते. मोठ्या अर्थाने प्रेम आणि त्यापुढे जाऊन भक्ती हे माणसाच्या जीवनाचे साध्य आहे हा या कादंबरीत सहजपणे आलेला विचार अत्यंत खुसखुशीत आणि खुमासदार पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न "ढाई अक्षर प्रेम के" या नाटकात करण्यात आलेला आहे.जीवन विषयक तत्वज्ञान असले तरी छोट्या छोट्या उदाहरणांतून आणि मनोरंजक संवादातून हे नाटक आपल्याला विचार करायला लावेल असं हे नाटक असणार आहे.