सध्या हिंदी व पाश्चिमात्य संगीताचा मारा मोठ्या प्रमाणावर होतोय. अशा परिस्थितीत मराठी संगीत आजच्या युवा पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. अनेक गुणी कलाकार त्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातलेच एक नाव म्हणजे...ओजस जोशी. या युवा संगीतकाराने ‘ओजस जोश’ या माध्यमातून मराठी गीतांचा नजराणा श्रोत्यांसाठी आणला आहे. ओजस जोशचं ‘मित्रांनो’ हे तिसरं गीत नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकशित करण्यात आले.
बघितलं जे स्वप्न आहे, कठीण त्याची वाट आहे.
थकायचं थांबायचं आता नाही, ध्येय तुला गाठायचे आहे.
रुपेश पवार यांनी लिहिलेले हे गीत ओजस जोशी यांनी गायले आहे. म्युझिक मिक्सिंग आणि मास्टरिंग अमेय गुंडाळे तर छायांकन अभिजीत सिंग यांचे आहे. आजच्या युगात विदयार्थ्यांवर बराच ताण असतो. या ताण तणावावर मात करून आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जाण्याचा संदेश या गीतातून देण्यात आला आहे. ओजस जोशी यांची ‘काही तरी करून दाखवायचं आहे’ आणि ‘रुसणं’ ही दोन गीते याआधी प्रकाशित झाली आहेत. तुम्हाला या गीतांचा आस्वाद घ्याचा असेल तर ‘सावन’, आयट्युन्स, युट्युब या वेबपोर्टलवर जाऊन ‘Ojas Josh’सर्च करावं.
आपल्या या उपक्रमाबद्दल बोलताना ओजस जोशी सांगतात की, मला मराठी संगीत प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यासाठी गुणी गायक, वादकांच्या व क्राउड फंडिंगच्या मदतीने मी हा उपक्रम सुरु केला आहे. इलेक्ट्रॅानिक म्युझिक आणि मराठी कविता यांचा मेळ साधत आम्ही ही तीन गीते रसिकांसाठी आणली आहेत. माझ्या आधीच्या दोन गीतांना मिळालेला प्रतिसाद खूपच चांगला आहे. ‘मित्रांनो’ हे तिसरं गीत ही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास ओजस जोशी यांनी याप्रसंगी व्यक्त केला. भविष्यात आणखी चांगली गीते प्रकाशित करण्याचा मानस ओजस जोशी यांनी यावेळी बोलून दाखवला.