‘बापजन्म’-एका पित्याचा जन्म
लोक आपली जन्मतारीख बदलतात...इथे कदाचित पहिल्यांदाच कुणीतरी त्याची मृत्युतारीख बदलली आहे
भास्कर पंडित रुग्णालयातून घरी परत येतात. त्यांना आत्ताच कळले आहे की, त्यांना कर्करोग आहे आणि त्यांचे आयुष्य साधारण एक वर्ष उरले आहे. पण या गोष्टीचा त्यांना धक्का वगैरे बसलेला दिसत नाही. याचे एक कारण म्हणजे हे सर्व सांगण्यासाठी त्यांना कोणीही नाही. त्यांच्यासाठी रडणारेही कोणीच नाही.
ते त्यांचा नोकर माऊली आणि त्यांचा कुत्रा टायगर यांच्याबरोबर पुणे येथे एका बंगल्यात राहतात. त्यांची पत्नी रजनी पाच वर्षांपूर्वी मरण पावली आहे. त्यांची मुले विक्रम आणि विणा हे आपापल्या आयुष्यात दंग आहेत आणि त्यांना आपल्या वडीलांबरोबरचे संबंध टाकले आहेत. भास्कर पंडित आपले एक साचेबद्ध आणि शिस्तबद्ध आयुष्य जगत आहेत. सकाळी बरोब्बर ५.३० वाजता उठायचे, लिंबू घालून गरम पाणी प्यायचे, एक तासभर जॉगिंग करायचे आणि घरी परतायचे. त्यानंतर ते आपल्या दैनंदिनीमध्ये लिहितात, एक्स-बॉक्सवर ‘कॉल ऑफ डूटी’ खेळतात किंवा मग आपटे या शेजाऱ्याची विचारपूस करतात. आपटे हे त्यांच्यासारखेच एकटे आयुष्य जगात आहेत. एकच फरक म्हणजे आपटे यांना अल्झायमरने ग्रासले आहे. भास्कर हे केवळ त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्या शेजारी बसतात. दोघे एकही शब्द बोलत नाहीत, कारण आपटे यांना शब्दच आठवत नाहीत तर भास्कर यांच्याकडे काही बोलण्यासारखे नाही.
ज्या दिवशी भास्कर यांना आपल्या आयुष्याचा अंत कळतो त्या दिवशी ते त्याबद्दल दैनंदिनीत लिहून ठेवतात. ती बंद करायला जातात तेव्हा त्यांचे लक्ष दैनंदिनीतील आदल्या दिवसाच्या नोंदीवर जाते. मग त्याच्या आदल्या दिवसाची नोंद आणि मग त्याच्या आदल्या दिवसाची नोंद....असे करत ते पूर्ण एक वर्ष मागे जातात. त्यांच्या ध्यानात येते की, गेले संपूर्ण एक वर्ष ते एकच आयुष्य जगत आहेत!
मग ते हा सर्व मामला स्वतःच्या पद्धतीने हाताळण्याचे ठरवतात. माऊलीच्या माध्यमातून मग ते आपल्या मुलांना कळवतात की, त्यांचा मृत्यू झाला आहे! हे ऐकून त्यांची मुले धावत घरी येतात.
त्यानंतर जे जे घडते ती अनोख्या प्रसंगांची साखळी आहे. सर्वकाही विश्वासार्ह वाटावे म्हणून स्मशानात नेले जाण्यापासून आपल्या मुलांना आपल्याबद्दल काय म्हणायचे आहे या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवण्यापर्यंत सर्व गोष्टींचा त्यात समावेश आहे. त्यांच्या एक ध्यानात येते की, कुटुंबापासून दुरावण्याला तेसुद्धा काही प्रमाणात कारणीभूत आहेत. ते अगदी छोटा प्रयोग करतात आणि छोट्या छोट्या गोष्टींतून त्यांच्याबद्दल काही चांगल्या गोष्टी मुलांना आठवून देण्याचा प्रयत्न करतात. त्यातून मुलांचा आपल्या वडिलांबद्दलचा दृष्टीकोन बदलावा हा प्रयत्न असतो.
पण ही बाब वाटते तेवढी सोपी नसते, कारण भास्कर यांनी आपल्या हृदयात एक गुपित दडपून ठेवलेले असते. त्यांच्या कुटुंबातील कुणालाच माहित नासेलेले एक गुपित...कदाचित, त्यांचा मुलगा अपवाद करून...