Friday, October 27, 2017

अतरंगी 'देवा' चे अनोख्या पद्धतीत झाले टीझर लाँच !!

'देवा एक अतरंगी' हा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या आयुष्यात नवा रंग भरण्यास सज्ज झाला आहे. इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित 'देवा' या सिनेमाच्या टीझरचे नुकतेच दादर येथील प्लाझा सिनेमागृहात अनोख्या शैलीत सादरीकरण करण्यात आले. प्लाझा सिनेमागृहातील संपूर्ण स्टाफ आणि टेक्नीशियन्सच्या हस्ते लाँच करण्यात आले. कोणताही सिनेमा पडद्यावर साकार होण्यामागे, पडद्यामागील टेक्नीशियन्स आणि युनिट मेंबरचा महत्वाचा हातभार असतो, त्यामुळे 'देवा' सिनेमाच्या संपूर्ण टीमने आपल्या पहिल्या टीझरच्या अनावरण सोहळ्यात प्लाझा सिनेमागृहातील सर्व कर्मचाऱ्यांना सोबतीला घेत, मराठी सिनेसृष्टीत एक नवा पायंडा उभारला. 
दक्षिणात्य दिग्दर्शक मुरली नल्लप्पा दिग्दर्शित हा सिनेमा १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
ह्या सिनेमाच्या टीझरमधून मराठीची ग्लॅम अभिनेत्री तेजस्विनी पंडित प्रथमच एका नव्या लुकमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. ज्यात ती लेखिकेच्या भूमिकेत दिसून येते. या सिनेमाच्या टीझरमध्ये, तिने साकारलेल्या 'माया' या व्यक्तिरेखेच्या नजरेतून 'देवा' चा शोधप्रवास आपल्याला पाहायला मिळतो. शिवाय अतरंगी देवाच्या रंगबेरंगी छटा या ट्रेलरमध्ये दिसून येत असून, डॉ. मोहन आगाशे, वैभव मांगले, पंढरीनाथ कांबळे, मयूर पवार हे कलाकारदेखील आपणास पाहायला मिळतात. विशेष म्हणजे यापूर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या 'देवा' सिनेमाच्या पोस्टर आणि मोशन पिक्चर्समध्ये आतापर्यंत  पाठमोरा दिसणारा अंकुश चौधरीदेखील प्रेक्षकांसमोर आला असल्यामुळे, त्याच्या चाहत्यांसाठी हा टीझर खास ठरत आहे. मायाच्या नजरेतला हा 'देवा' प्रेक्षकांसाठी मोठा कुतूहलाचा विषय बनत आहे.