नाटकात ‘त्या दरम्यान’ हा खरेतर प्रेक्षकांसाठी नेहमीच कुतूहलाचा औत्सुक्याचा विषय असतो, नाटकाच्या मुख्य कथानकातली पात्र जेव्हा प्रसंगाआड असतात,तेव्हा काय घडत असेल हा नव्या शक्यतांना जन्म देणारा भाग असतो. आपल्याकडे नाटकाचा पुढचा भाग लिहण्याची मोठी परंपरा आहे,पण त्या दरम्यान काय घडले असेल याचा स्वतंत्र नाट्यकृती म्हणून विचार करण्याचा प्रयत्न अपवादाने झाला आहे. हा वेगळा प्रयत्न घडावा आणि नवे काही हाती लागावे म्हणून ‘अस्तित्व’ने ‘त्या दरम्यान’ हा उपक्रम हाती घेतला त्यातून युवा नाट्यलेखक हृषीकेश कोळी याने जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’ नाटकावर आधारित त्या दरम्यान ‘वर खाली दोन पाय’ या नाटकाच्या रूपाने शब्दबद्ध केले आहे.
या नाटकात त्या दरम्यान घडणारी गोष्ट म्हणजे अजरामर पात्रांची मानसिकता शोधायला निघालेल्या आजच्या नटांना ८६ सालातलं पात्र वेगळ्या भुमिकेत शिरलेली भासू लागतात आणि लेखकाने लिहलेलं खरं नाटक करण्यास नकार देऊन, नटांच्या कल्पनाशक्तीसमोर आव्हान निर्माण करतात आणि तिथे सुरु होतो नट विरुध्द पात्र असा अनाकलनिय संघर्ष.पात्रांना अपेक्षित असलेला नाटकाचा शेवट, नटांमार्फत होऊ शकेल का? जुन्या पुरुष नाटकामधुन सुरु झालेला हा मानसिक संघर्ष नाटकाला नेमक्या कोणत्या पातळीवर नेऊन ठेवणार.? थिएटर ऑफ क्रुअलिटीचं समर्थन करणारं, अस्तित्ववादी नाटक म्हणजे ‘वर खाली दोन पाय’.
या नाटकाचा आशय,विषय आणि अभिव्यक्ती यामुळे हे नाटक त्याच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या अभिवाचनापासून चर्चेत होते,पण ते रंगभूमीवर आणण्याचे धाडस ‘रंगालय’ या वैशाली भोसले आणि सुगंधा कांबळे यांच्या युवा रंगकर्मींच्या संस्थेने ‘अस्तिव’च्या सहयोगाने केले. सध्याच्या चौकटी भेदून नव्या नाट्यशक्यता आजमवण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली असून लेखन,दिग्दर्शन,अभिनय,नेपथ्य,प् रकाश,संगीत यात वेगळा प्रयोग करणारे हे नाटक म्हणूनच रंगभूमीवर आणण्याचे संस्थेने ठरवले.
मराठी रंगभूमी,मालिका क्षेत्रातली अभिनयसंपन्न म्हणून नावारूपाला आलेले युवा कलाकार वेळ काढून या प्रयोगात आवर्जून सहभागी झाले आहेत. सुशिल ईनामदार,नंदीता पाटकर.रोहन गुजर,संग्राम समेळ,पल्लवी पाटील,मयुरा जोशी,अमेय बोरकर,अजित सावंत या प्रथितयश कलावंतांसोबत स्मृती पाटकर आणि चंद्रकांत मेहेंदळे या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत.गेले सव्वा दोन महिने या नाटकाची कसून तालीम सुरु आहे.
विशेष म्हणजे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मानाच्या समजल्या जाणाऱ्या जुहूच्या पृथ्वी थिएटरमध्ये येत्या मंगळवारी १६ मे रोजी रात्री ९ वाजता होणार आहे. सुयोग भोसले,सचिन गोताड यांचे नेपथ्य, सायली सोमण यांची वेशभूषा,भूषण देसाई यांची प्रकाशयोजना आणि पुष्कर कुलकर्णी याचे संगीत यामुळे हा प्रयोग वेगळा ठरणार आहे. या नाटकाचे ट्रेलर सध्या सोशल मिडीयावर लोकप्रिय ठरले आहेत. आजपर्यंत केल्या जाणाऱ्या नाटकाच्या पारंपरिक जाहिरातींना छेद देत , नाटक प्रेक्षकापर्यंत पोहचविण्यासाठी वेगळ्या धाटणीचा कल्पक मार्ग रंगालयतर्फे अवलंबण्यात आला आणि लोकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद हेच ह्या कल्पक जाहिरात संकल्पनेच यश आहे. त्यामुळे भविष्यातील जाहिरातीसाठी हा मैलाचा दगड ठरलेला आहे.त्यामुळेच या नाटकाच्या प्रयोगांबद्दल प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.
‘अगदीच शून्य’ रौप्यमहोत्सवी प्रयोग पृथ्वी थिएटर मध्ये
गेल्या वर्षभरात विविध नाट्यमहोत्सवांमध्ये विशेषत्वाने गाजलेल्या अस्तित्व,मुंबई आणि मितीचार,कल्याण निर्मित युगंधर देशपांडे लिखित आणि रवींद्र लाखे दिग्दर्शित ‘अगदीच शून्य’ या प्रायोगिक नाटय़ चळवळीतल्या महत्वाच्या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग येत्या मंगळवारी १६ मे रोजी संध्याकाळी सहा वाजता जुहूच्या पृथ्वी थिएटर मध्ये संपन्न होणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक रवी लाखे यांच्या सर्जनशील मार्गदर्शनातून आकाराला आलेले हे नाटक दिग्दर्शन कसे असावे याचा वस्तुपाठ म्हणून गौरवले जात आहे. प्रायोगिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाने वेगळे स्थान निर्माण केलेले अक्षय शिंपी, अमोल कुलकर्णी तसेच ऋतुराज फडके या तिघांच्या अस्सल अभिनयाने हा प्रयोग रंगतो. प्रीतीश खंडागळे यांचे अपेक्षित परिणाम साधणारे संगीत, मकरंद मुकुंद यांची समर्पक प्रकाशयोजना याही बाबी नाटय़परिणाम उंचावण्यात मोलाची भर घालतात. केवळ पुरस्कारांसाठी प्रायोगिक नाट्यनिर्मिती होण्याच्या सध्याच्या काळात प्रयोगातले सातत्य राखून रौप्यमहोत्सवी वाटचाल करणे हे या नाटकाचे यश आहे.

