Saturday, April 29, 2017

संस्कृती कला दर्पण गौरव रजनीची सर्वाधिक नामांकने जाहीर !


मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील नवोदित तसेच ज्येष्ठ कलाकारांचा यथोचित सन्मान करणा-या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी पुरस्काराने महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात आपली विशेष मोहर उमटवली आहे. गेली १७ वर्षे सातत्याने मनोरंजन कलाकृतींना आणि त्यातील कलावंतांना नावाजणाऱ्या या पुरस्कारांमध्ये चित्रपट, लघुचित्रपट,  व्यावसायिक नाटक, टीव्ही मालिका आणि वृत्त वाहिनी अशा एकूण पाच विभागातील नुकतीच नामांकने जाहीर झाली आहेत. यावर्षी प्रथमच लघुचित्रपट विभागासाठी देखील पुरस्कार जाहीर करण्यात आले, ज्यात दि अंडरकवर गणेशा प्रॉडक्शन निर्मित 'प्रदोष' या लघुचित्रपटाने सर्वोत्कृष्ट होण्याचा मान मिळविला. या लघुचित्रपटाला २५ हजार रोख आणि संस्कृती कलादर्पण रजनीचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. 
यंदाच्या १७ व्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्काराच्या नाटक विभागातील यादीत सर्वोत्कृष्ट नाटकांमध्ये 'कोडमंत्र', 'साखर खाल्लेला माणूस', 'के दिल अभी भरा नही', तीन पायांची शर्यत' आणि 'यु-टर्न २', या नाटकांचा समावेश आहे. त्यापैकी सर्वोत्कृष्ट नाटक अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, लक्षवेधी अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना या विभागातील पुरस्काराकरिता चुरशीची स्पर्धा रंगली. चित्रपट विभागातील पुरस्कारांवर सध्याच्या गाजत असलेल्या सिनेमांनी स्थान मिळवले आहे. त्यात 'व्हेंटीलेटर ' आणि 'नातीखेळ' आघाडीवर आहेत, तसेच 'कासव' या चित्रपटाला विशेष लक्षवेधी पुरस्कार आणि 'दशक्रिया' या चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर करण्यात आला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, संकलन, छायांकन, संगीत, पार्श्वगायक, संवाद, पटकथा, कथा, खलनायक, सहाय्यक अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट अशा एकूण १३ पुरस्कारांसाठी 'व्हेंटीलेटर ' या सिनेमाला नामांकनं प्राप्त झाली आहेत. त्यानंतर 'नातीखेळ' या चित्रपटालादेखील इतर नामांकनाबरोबरच सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे,  
मालिका विभागातील पुरस्कारांमध्ये  कलर्स मराठीवरील  'सरस्वती' आणि 'अस्सं सासर सुरेख बाई' या कार्यक्रमांनी छाप पाडली आहे. सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कार नामांकनात एकूण ५ मालिकामध्ये चुरशीची लढत रंगली आहे.   
नाट्य विभागातील पुरस्कारांसाठी एकूण सात सर्वोत्कृष्ट नाटकांची निवड करण्यात आली. यात 'साखर खाल्लेला माणूस', 'कोडमंत्र', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'छडा', 'यु टर्न २', 'तीन पायांची शर्यत', 'के दिल अभी भरा नही' या नाटकांचा समावेश आहे. या स्पर्धेत एकूण २४ नाटकांच्या प्रवेशिका दाखल झाल्या होत्या, तसेच १८ व १९ एप्रिल दरम्यान झालेल्या चित्रपट महोत्सवात ११ सिनेमांची अंतिम निवड करण्यात आली, ज्यात घुमा, कासव, नातीखेळ, माचीवरला बुधा, व्हेंटीलेटर, हाफ तिकीट, दशक्रिया, वजनदार, गुरु, पोस्टर गर्ल, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या चित्रपटांनी पहिल्या बाजी मारली होती. चित्रपट विभागातील ज्युरी मंडळात असलेल्या मिलिंद गवळी, अमित भंडारी, रमेश मोरे, राजीव पार्सेकर, सुशांत शेलार आणि समृद्धी पोरे यांनी निवड झालेल्या चित्रपटांचे परिक्षण केले आहे. नाट्यपरिक्षण विभागातील कांचन अधिकारी, प्राजक्ता कुलकर्णी आणि प्रमोद पवार यांनी यंदाच्या नाट्यस्पर्धेच्या परिक्षणाची धुरा सांभाळली होती. यंदाच्या वर्षीचा मराठी चित्रपट क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मालाड येथील ग्रीन लीफ पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा दिमाखात पार पडला. 
चित्रपट विभागात प्रथम येणाऱ्या कलाकृतीला बक्षीस रोख रक्कम रुपये दीड लाख तर नाट्य विभातील विजेत्यांना एक लाख रुपये बहाल केले जाणार आहे. तसेच दोन्ही प्रमुख विभागातील संबंधित इतर सहाय्यक विभागातील विजेत्यांना संस्कृती कला दर्पण गौरव रजनीचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येईल. ७ मे २०१७ रोजी सायंकाळी ७ वाजता जोगेश्वरी (पूर्व) येथील कमल अमरोही स्टुडियो (कमालीस्तान)मध्ये अंतिम पुरस्कार सोहळा होणार असल्याची माहिती संस्कृती कलादर्पण संस्थेचे अध्यक्ष -संस्थापक चंद्रशेखर सांडवे आणि अध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी दिली