Wednesday, August 29, 2012

विभोर या मिलिंद जोशी आणि उज्ज्वला अन्नछत्रे यांच्या नव्या काव्यसंग्रह व म्युझिक अल्बम चे प्रकाशन !

'' आयुष्य जगताना हरवलेले अनेक क्षण कवितेच्या रूपाने मुठीत पकडण्याचा प्रत्येक कवीचा प्रयत्न असतो, त्यादृष्टीने पाहिल्यास कवयित्री उज्ज्वला अन्नछत्रे  यांच्या कवितांना प्रगल्भतेचा स्पर्श आहे. 'विभोर' हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह असला तरी त्यामध्ये नवखेपणाच्या खुणा नाहीत, असे भावोद्गार प्रसिद्ध  कवयित्री  अरुणा ढेरे यांनी येथे काढले. पुण्यातील कवयित्री उज्ज्वला अन्नछत्रे  यांच्या 'विभोर' काव्यसंग्रहाचे  व  'म्युझिक अल्बम'  चे  प्रकाशन अनुक्रमे ज्येष्ठ कवयित्री  अरुणा ढेरे व ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांच्या हस्ते रविवारी येथे झाले. त्यानिमित्त अरुणा ढेरे बोलत होत्या. व्यासपीठावर उत्कर्ष प्रकाशनाचे सुधाकर जोशी, प्रा. नीलिमा गुंडी, संगीतकार मिलिंद जोशी,  ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, रघुनंदन पणशीकर, 'फाऊनंट म्युझिक'  चे कांतीभाई ओसवाल, कवयित्री उज्ज्वला अन्नछत्रे , अरुण अन्नछत्रे आदी उपस्थित होते.  या सोहळ्यानिमित्त उपस्थित  रसिकांना काव्यवाचन व काव्यगायन ऐकण्याचा दुग्धशर्करा योग अरुण अन्नछत्रे, 'उत्कर्ष प्रकाशन' आणि 'फाऊनंट म्युझिक' यांनी घडवून आणला होता.
        ''आयुष्य जगताना येणाऱ्या विविध अनुभवातूनच कविता जन्माला येते असे सांगताना कवयित्री  अरुणा ढेरे पुढे म्हणाल्या की, सर्वसामान्यांना जे अनुभव येतात तेच अनुभव कवीच्याही वाट्याला आलेले असतात, परंतु कवीचे संवेदनशील मन अशा अनुभवामुळे अस्वस्थ होते व त्यातूनच चांगली कविता जन्माला येते. कवयित्री उज्ज्वला अन्नछत्रे यांच्या कवितेत संवेदनशीलतेबरोबरच सखोलता व प्रगल्भता आहे, त्यामुळे त्यांची प्रत्येक कविता वेगळ्या जातकुळीची वाटते शिवाय त्यांच्या प्रत्येक कवितेला वेगळा चेहरा आहे, असेही त्यांनी सांगितले. कवयित्री म्हणून त्यांची पुढची वाटचाल खूपच आश्वाशक आहे असे त्यांनी शेवटी सांगितले. तर प्रा. नीलिमा गुंडी यांनी उज्ज्वला अन्नछत्रे यांच्या कविता व्यैविध्यपूर्ण असून त्यामुळे त्या रसिकांशी 'मैत्री' करणाऱ्या आहेत असे सांगितले. 'विभोर' काव्यसंग्रहाचे  व 'मुझ्यिक अल्बम' चे  प्रकाशन एकाचवेळी झाल्याने ' अक्षर, नाद आणि रेखांच्या अनोख्या एकत्रीकरणाचे दर्शन झाले असेही त्या म्हणाल्या.
               ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग 'मुझ्यिक अल्बम' चे  प्रकाशन करताना म्हणाले की, कवयित्री उज्ज्वला अन्नछत्रे  यांच्या कवितांना संगीतकार मिलिंद जोशी यांनी दिलेल्या चाली अतिशय वैविध्यपूर्ण असून ही गाणी वेगवेगळ्या वयाच्या रसिकांना नक्क्कीच आवडतील अशी आशा आहे.संगीतकार मिलिंद जोशी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, उज्ज्वला अन्नछत्रे  यांच्या कवितेमध्ये विविधतेबरोबरच गेयता असल्यामुळे ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, रघुनंदन पणशीकर या दिग्गज गायकांसह चैतन्या अन्नछत्रे सारख्या तरुण व ताज्या दमाच्या गायिकेकडून गाणी गाऊन घेणे सोपे झाले.
          'विभोर'च्या कवयित्री उज्ज्वला अन्नछत्रे यांनी आपल्या काव्यजीवनाच्या प्रवासाचा आढावा घेतला. लहानपणी आजीने सांगितल्यामुळे 'डायरी' लिहून ठेवण्याची सवय पुढे कविता लिहायला खूप मदतीला आली असे सांगताना त्या म्हणाल्या, जगाच्या पाठीवर असलेल्या असंख्य देशात माझी भटकंती झाली व तेथे आलेले काही अनुभव मी कवितेच्या रूपातून शब्दबद्ध केले.
याप्रसंगी ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, रघुनंदन पणशीकर, मिलिंद जोशी तसेच उज्ज्वला अन्नछत्रे  व  चैतन्या अन्नछत्रे यांनी 'विभोर' या 'मुझ्यिक अल्बम'  काही निवडक गाणी गाऊन उपस्थित रसिकांचे छान  मनोरंजन केले. प्रारंभी श्री अरुण अन्नछत्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी जोशी यांनी केले.      
Posted By RASRAJ