Monday, August 13, 2012

दिग्दर्शकाच्या भूमिकेत "अभिजित पानसे" !

शिवसेनेच्या भारतीय चित्रपट सृष्टीचे अध्यक्ष आणि लेखन-  काव्य या क्षेत्रातील धडाडी वृत्तीचे नेते श्री. अभिजित पानसे प्रथमच दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेक्षेत्रात पाऊल टाकत आहेत.
'रेगे'  या आगामी मराठी चित्रपटाचे ते दिग्दर्शन करणार असून नुकताच या सिनेमाचा मुहूर्त  शिवसेनेचे खा.संजय राऊत यांच्या हस्ते कमालिस्तान स्टुडिओ येथे पार पडला.
"द आर्टबीट" या निर्मिती संस्थेचा 'रेगे हा पहिला मराठी चित्रपट असून डॉ. सुहास संखे  आणि श्री. अभिजित पानसे  या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.
प्रत्येक तरुण मुलाच्या आयुष्यात एक महत्वाचा टप्पा येतो, आणि तो गोंधळवून टाकणारा क्षण आपल्याला अतिशय पेचात पाडतो पण अशा  प्रसंगातून योग्य निवड जो कोणी करू शकतो तो आयुष्यात कुठेही जिंकू शकतो. भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असताना मला विविध वयोगटातल्या विद्यार्थ्यांना जवळून पाहता आलं. आणि अशाप्रकारच्या विषयावर आपण सिनेमा बनवावा असं मी निश्चित केलं. मला वाटतं सामाजिक संदेश ठळकपणे मांडण्यासाठी चित्रपट हे माध्यम आजच्या पिढीला आकर्षित करू शकतं अशी प्रतिक्रया त्यांनी व्यक्त केली. 
आरोह वेलणकर, पुष्कर श्रोत्री, संतोष जुवेकर, प्रविण तरडे, आणि महेश मांजरेकर अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे.   
दबंग, हिरोईन  फेम महेश लिमये या सिनेमाच्या छायांकनाची जवाबदारी पार पडणार असून सर्वांचे आवडते गायक , संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळणार आहेत.
आर्ट बीट’ या निर्मिती संस्थेअंतर्गत निर्मित होणारा हा सिनेमा २०१३ च्या जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.


कथा, पटकथा, दिग्दर्शन : अभिजित पानसे
संवाद : प्रविण तरडे, अभिजित पानसे
छाया : महेश लिमये
संगीत : अवधूत गुप्ते
कला : संतोष फुटाणे
सहदिग्दर्शक : रविंद्र करमरकर, शिवकुमार पार्थसारथी
कार्यकारी निर्माता : रत्नकांत जगताप
Posted By RASRAJ