Sunday, June 24, 2012

करवीरपीठाचे जगदगुरू शंकराचार्यांच्या हस्ते ‘नमो ब्रम्ह स्वरूपाय’या अल्बमचा अनावरण सोहळा !



मुंबई जून २०१२ : आषाढी एकादशीहा दिवस सर्व भक्त – भाविकांसाठी एक अध्यात्मिक आनंदाचा दिवस मानला जातो म्हणून ह्या दिवसाचे औचित्य साधून स्वराधीश भरत बलवल्ली आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात श्री भगवान दत्तात्रेय आणि श्री स्वामी समर्थ अक्कलकोटयांच्यावर आधारित सी.डी. चे अनावरण सोहळा करवीरपीठाचे जगदगुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शनिवार दि. ३० जून रोजी सायंकाळी ७ वा. हा भव्य भक्तिसंगीत आणि अभंगवाणीचा कार्यक्रम, स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह , शिवाजी पार्क समोर, दादर येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम भारतीय आयुर्विमा निगमयांनी पुरस्कृत केला असून युनिव्हर्सल म्युझिक कंपनीने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. ह्या कार्यक्रमात वीर सावरकरांच्या वाड्मयातील ३१ काव्याना गीतरूपाने मराठीत व हिन्दीत संगीतबध्द करून संगीत क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमटविणारे संगीतकार, गायक स्वराधीश भरत बलवल्ली त्यांच्या बरोबर मधुरा दातार आणि नीलाक्षी पेंढारकर आपली गाणी सादर करणार आहेत. कमलेश भडकमकर आणि झी सारेगमपया कार्यक्रमातले वादक या कलाकारांना साथसंगत करतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर करणार आहेत.


नमो ब्रम्ह स्वरूपाय या सीडीमध्ये स्वामी समर्थांच्या मठात होणार्‍या आरत्या, गाणी श्री दत्त संपद्रायात पठण केली जाणारी स्तोत्रे व मंत्र, जगदगुरू आद्यशंकराचार्यांनी लिहिलेले आत्मषटक,रावणलिखित शिवतांडव स्तोत्र इत्यादि गाण्यांचा समावेश आहे. स्त्रोत्रांच्या शब्दांचा व्यंजननाद श्रुतींचा अभ्यास आणि जेष्ठ – श्रेष्ठ गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली गायल्या गेलेल्या गाण्यांचा व स्तोत्रांचा प्रभाव अनुभवण्यासारखा असून अनेक सकारात्मक लहरींनी विचार आणि ध्यायधारणेत परिवर्तन होते. या अल्बममधल्या गाण्यांचे संगीत संयोजन आधुनिक तंत्र पद्धतीद्वारे करून थोडया गाण्यांना ग्रँड पियानो वापरला गेला आहे. तरुण बासरीवादक निनाद मुळवकर , की-बोर्ड वादक अभिषेक मेस्त्री आणि तबला-पखवाज वादक अनिरुध्द शिर्के यांनी या अल्बमचे संगीत संयोजन केले आहे.


उदघाटन सोहळ्यानंतर अभंगवाणीचा कार्यक्रम सुरू होणार असून पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. श्रीनिवास खळे, गानसरस्वती किशोरीताई अमोणकर,बालगंधर्व, पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या अभंगांचे सादरीकरण करण्यात येणार असून संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर,संत सोयराबाई, संत चोखामेळा इत्यादी संतांच्या रचना देखील सादर करण्यात येणार आहेत. आषाढी एकादशी निमित्त अध्यात्मक आणि संगीत याचा उत्तम मिलाप असलेला ह्या सोहळयाचा सर्व संगीतप्रेमी रसिकांना विनामुल्य आस्वाद घेता येईल.
Posted By RASRAJ